← सर्व किल्ल्यांकडे परत जा

साल्हेर

जिल्हा:नाशिक
विभाग:नाशिक विभाग
उंची: १५६७ मीटर
प्रकार: गिरीदुर्ग
कठीणता: मध्यम
जवळचे गाव: वाघांबे,साल्हेरवाडी
पर्वतरांग: सेलबारी-डोलबारी(बागलाण)
सद्यस्थिती: व्यवस्थित
स्थापना: अज्ञात

परिचय

साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत.

जागतिक वारसा स्थळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे.

कसे जाल?

साल्हेरचा किल्ला सटाण्याच्या पश्चिमेला आहे. डांगसौंदाणे-ततानी मार्गे ४० कि.मी. व ताहाराबाद -मुल्हेर-वाघांबे मार्गे ५६ किमी अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन गाडीमार्ग आहेत. ततानी मार्गे प्रवास चांगला होतो. थोडा घाटमार्ग आहे परंतु निसर्गरम्य आहे. वाघांबे मार्गे रस्ता अतिशय सुंदर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साल्हेर गावातून वन विभागाची पावती आवश्यक आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना सकाळी 6 वा ते संध्याकाळी 6 वा या वेळेत परवानगी आहे तसेच किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी असून मुक्काम करायचा असल्यास वन विभागाची पुर्व परवानगी व पावती आवश्यक आहे. सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लागूनच  साल्हेरचा हा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. समुद्रसपाटीपासून १५६७ मीटरची उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर, साल्हेर असे याचे नाव पडले अशा लोककथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.